श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज
कृष्णातीरी वाडी सुंदर, वसतसे तेथे नृसिंह यतिवर
श्री दत्तगुरुंचा केवळ हो, भक्तांसाठी तो अवतार
काषायवस्त्र कांती शुभ्र, रुद्राक्ष माला हाती कमंडलु
हाती दंड जणू तो धरिला, प्रेमळ भक्त नित्य रक्षिण्या
द्वादश वर्षे वास केला, केल्या अगणित अनंत लीला
पाहुनिया हो त्या सकला, गुरुदत्त घोष हा नभी दुमदुमला
पलिकडले ते अमरेश्वर, भुवनेश्वरीचा निवास सुंदर
तेथील यक्षिणी येती अपार, पूजन करण्या नित्य गुरुवर
श्रीगुरुंच्या त्या दरबारी, सुंदर पादुका औदुंबर तळी
भक्तांंची हो ये जा सारी, पादुका पूजनी आनंद हो भारी
प्रदक्षिणांची सेवा न्यारी, पदी पदी भक्त दत्त नाम हो गाई
पाहुनि भक्तांची मांदियाळी, हर्षे ती श्रीगुरुंची स्वारी
वर्षति कृपा दान सत्वरी, धरुनि ओंजळी मी स्वीकारी!
******
Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
गाणगापुरी पादुका निर्गुणी, भक्त ध्याती क्षणोक्षणी
संतोषोनि नृसिंह मुनी, कृपेची उघडती खाणी
हिरेमाणकाची ती खाणी, भक्ति ज्ञानाचे ते मणी
अलंकार घालता ते गुणी, वैराग्य उपजे ते मनी
लौकिक वाटे कवडीवाणी, त्वरितचि पोहोचते निर्गुणी
ही पादुकांची कहाणी, म्हणुनि पूजा क्षणोक्षणी
निर्गुण मठी बसती श्रीगुरु, भक्त दर्शनासी अपारु
विनविती आम्हा अंगिकारु, तेणे पावू भवपारु
म्हणती धरा थोडा धीरु, तुम्हावरु असे नजरु
नका काही घाबरु, ठेविता आमचा कृपाकरु
ऐकता हर्षित अंतरु, चरणी त्या ठेविती ते शिरु
संगमी वृक्ष औदुंबर, गुरुंचे आवडते स्थान
सांगती त्याचे महत्व अपार, भक्त दर्शनी अपार
सेवा करिती प्रदक्षिणांची, मंद मंद गतीची
मुखी दत्त नाम घोषाची, चित्ती श्रीगुरु धरिला असेचि
पाऊल पुढे पुढे पडताचि, लागे देहभान विसरुचि
शक्ति एकवटोनि चित्तीची, श्रीगुरु दिसती समोरचि
वाटे धन्यता मनीचि, अशी ही कथा प्रदक्षिणांची
संगमीच्या पवित्र औदुंबराची
गुरुंची पालखी निघाली, भक्त चालती दुडक्या चाली
धरिती छत्र पताका वरी, वाजती नगारे नौबती
बसले दत्त दिगंबर यति, गळा माळा रुद्राक्ष अति, सवे सुगंधित हार शोभिती
दत्त दिगंबर दत्त दिगंबर, भक्त नाम घोष गर्जती
दर्शना भक्त पुढे धावती, दर्शनि कुंठित होय मति
श्रीगुरु मुखकमल पाहता, हर्षिती चित्ती अति
संतोषोनि श्रीगुरुंचा, कृपाशीर्वाद लाधती
वाटे धन्य धन्य त्यांसी अति, ध्याती श्रीगुरु अखंड चित्ती
मनी हसे श्रीगुरुंची मूर्ती, श्री नृसिंह सरस्वती, श्री नृसिंह सरस्वती
अवधूत प्रकटला औदुंबर तळी, जनांची दर्शना धावपळी
रुप ध्यान ते सुंदर, मस्तकी जटाभार, भस्म सर्वांगावर
कर्णी कुंडले, रुद्राक्षमाळा गळ्यावर, छाटी अंगी, कौपीन कमरेवर
पायी शोभती खडावा सुंदर, सभोवती स्वर्गीय सुगंध दरवळत अपार
रुप लावण्य ते सुंदर, पाहता मौज अनिवार
दृष्टी जाताच मजकडे, रोमांचित काया अन् नाम स्फुरे मुखावर
जय अवधूत दिगंबर, जय अवधूत दिगंबर
वाडीग्रामी जाउनियाऽऽ, नमूया गुरूपदा
कृपे हरतो जोऽऽ, नाना आपदा
माथा टेकूयाऽऽ, नृसिंह स्वामीपदा
निरखितसे जोऽऽ, कृपादृष्टी सदा
सद्गद वाचे होऽऽ, त्याचे नामवदा
रूप पाहुनियाऽऽ, हृदयी मोद सदा
औदुंबर तळवटीऽऽ, ध्यानस्थ सदा
भावे प्रदक्षिणाऽऽ, करुनि नमू पदा
कृष्णदासऽऽ, हृदयी अधीर सदा
दर्शन करण्यासीऽऽ. श्रीनृसिंहपदा ॥
— सर्व रचना © कृष्णदास
Leave a Reply