श्री गिरनार यात्रा
श्री गिरनार यात्रा
वाट चाललो गिरनारीची, दशसहस्त्र त्या पथवाटेची
पदी पदी आठव त्या दत्ताची, दत्तगुरुंची दत्तगुरुंची
जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी ॥
प्रथम ओलांडली मी तीन शिखरे, काम क्रोध लोभ ही खरे, दिसू लागली मग गुरुचरणे
लगबग लगबग वरती गेलो, पवित्र मंगल चरणांवरी त्या, मस्तक ठेवुनी, धन्य मी झालो, धन्य मी झालो ॥
भानावरती मग मी येता, समजुनी चुकलो मी हा पुरता, केवळ दत्तकृपेने मी हो, शिखर ते चढलो, शिखर ते चढलो ॥
त्या शिखरी हो प्रचंड वारा, त्या शिखरी हो प्रचंड वारा, गुरुकृपेचा तो हा सारा, त्या वार्याने मी पण माझे, कधी उडविले मज नच कळले
वाटे माझे तप अजि फळले, वाटे माझे तप अजि फळले
दत्ताच्या ह्या दरबारी अजि, कधी पोहोचले, ते नच कळले
दत्ताच्या ह्या दरबारी अजि, मी रुजु झाले, रुजु मी झाले!
******
Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
धावा धावाऽऽ गिरीनारीच्या देवाऽऽ, धावा धावाऽऽ गिरीनारीच्या देवाऽऽ ॥
निराकार तू सर्वदेशी परी रूप सगुण मज दावा
सुहास्य सुंदर रुप मनोहर नयनांसी मम दावा ॥
भावभक्तिच्या उत्तुंग शिखरी निवास तुझा मज ठावा
झुरता निशिदिनी तुजसाठी या जीवा कधी न विसावा ॥
दर्शनासी आळविता अश्रूंचा पाट किती मी वहावा
कृपाळू दिनवत्सल नाम तव कृपेची प्रचित मजसी दावा ॥
त्रिशूल डमरू घेवुनि हाती, चालता, पायी वाजती खडावा
कामधेनू अन् श्वान संगे तू डुल्लतसे आत्मभावा॥
कामक्रोध षडरिपूंचा जाळीतसे मज वणवा
कृपाळू तव द्वारी आलो ऐकुनि तव कृपेचा गवगवा ॥
भक्ती ज्ञान वैराग्याच्या अर्पी मज तव विभवा
वैराग्याच्या अखंड धुनीत भस्मीभूत करी गा देहभावा ॥
आर्तस्वरे आळविता तुजसी अश्रूंसी कधिचि ना तो विसावा
साधनेच्या दुर्गम पथवाटे पदीपदी आठव तुझाचि व्हावा ॥
कृपा कृपा तव कृपाचि केवळ, त्याविना उध्दार ना तो जीवा
कृपांकित तव अगणित भक्तांचा वाटतसे मज हेवा ॥
सर्वसाक्षी तू अंतरीच्या मम जाणी तळमळी अन् भावा
शरणागत मी तुज सर्वथा स्वीकारी नमस्कार मनोभावा ॥
गिरिराज गिरनार पर्वती, गुरुराजाच्या भेटीसाठी, आशा बहु या जीवा
स्मर्तुगामी श्री दत्तप्रभु हो प्रगट तुम्ही हो व्हा व्हा ॥
श्री दत्तगुरु तू गुरु गुरुंचा गुरुराज मार्ग मज दाखवा
नित आनंदी त्या ब्रह्मानंदी तुम्हासंगे डोलवा ॥
भाव मनींचा मम अति शुद्ध जाणुनिया प्रभु धावा
पावा पावा दयाळू प्रभु तू प्रार्थनेसी या पावा ॥
कृष्णदास हा अति तळमळुनि करितसे तव धावा
जाणुनि ऐकुनि तळमळ दासाची या त्वरित प्रभु या धावा ॥
******
Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
आला आला दत्त अवधूत, आला आला दत्त अवधूत
पायी खडावा गर्जत, आला आला दत्त अवधूत
त्रिशूल डमरू दो हातात, शंख चक्र ते दुज्या करांत
कमंडलू तो वाम करात, अन् जपमाळा सव्य करात
आला आला दत्त अवधूत, आला आला दत्त अवधूत
माळ रुद्राक्ष शोभे गळ्यात, जटाभार शोभे शिरात
आला आला दत्त अवधूत
अखंड धुनीचे भस्म तनावरी, व्याघ्रचर्म ते असे कटिवरी
कृपाळू नेत्र, हास्य मुखावरी, ध्यान दिसे ते अति सुंदरी
चढता पर्वत हा गिरनारी, दर्शन अवधूत होय वाटेवरी
जय गिरनारी, जय गिरनारी, मुखी गा हो करता वारी
कृष्णदासही करता वारी, दर्शनाची इच्छा भारी
मुखी गातो जय गिरनारी, जय गिरनारी जय गिरनारी
******
Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
— सर्व रचना © कृष्णदास
Leave a Reply