श्री मुक्ताई
सिद्धबेटी लावुनि ताटी, बैसली आत, आज ज्ञानाई उदास उदास
कळेना तिघा भावंडा इतर, कारण झाले काय त्यांस ॥१॥
झोळी लावुनि काखे, गेली असता भिक्षेस
ना घालुनि भिक्षे, खळे अवमानिले, कटू हीन शब्दे आज त्यांस ॥२॥
कोमले बाल हृदयास, साहवले ना तीक्ष्ण वाग्बाणांस
परतले कुटीत खिन्न मने, झोळी आज रिकामीच खांद्यास! &॥३॥
विटले मन अतिशय अन् जनसंबंध नकोसा झाला आज
लावुनि ताटी आत एकटे घेतले कोंडुनि, स्वत:सीच स्वत:स ॥४॥
ध्यानमग्न ते मिटले डोळे, जरी अन्नाचा कण नसे पोटास
वाटले असेल काय बालह्रदया, स्मरले असेल मायपित्यास ॥५॥
कां दु:ख हे पदरास, अन् दुष्ट बुद्धी ही खळांस
जळ भरले नयनांस, ना साहवे दु:खास ॥६॥
काय काय ते विचार उमटले असतील मन:पटलास
वेदनेतही परि विश्व करुणा उफाळलीसे हृदयास ॥७॥
कुटीत बंद झाला होता आज ज्ञानाचा प्रकाश अन्
बाहेर पसरला विश्वात, भर माध्यान्ही,
अज्ञानाचा काळकूट अंध:कार! ॥८॥
निरसण्या अज्ञान दु:ख जनांचे अवनीवरी
असे ना दुजा सक्षम जो आज पेलेल या शिवधनुष्यास ॥९॥
जनार्दने पाठविले असे ज्यांसी जन उध्दारास
कसे पाववावे बरे त्या दु:खी मना समाधानास? ॥१०॥
गुरुराय निवृत्तीने दिली अंत:प्रेरणा, लहानग्या बहीणीस
झाली मुक्ताई पुढे, पुसाया त्या ज्ञानदादाच्या आसवांस ॥११॥
बाळ ज्ञान मन सांत्वनास, बोले मुक्ताई ज्ञान बोलांस
‘‘ज्ञानदादा तू रे ऐसा होऊ नकोसी उदास
तुजवीण ना कोणी जगी, या जना उद्धरण्यास’’ ॥१२॥
चिमुकल्या मुक्ताईचे बोल चिमुकले
शांती क्षमा दयेचे जणू ओतले ॥१३॥
काय अधिकार तिचा, मोजक्याच शब्दांत
साधना अन् बोधाचे मर्म उकलिले ॥१४॥
भावगर्भ शब्द जंव कानी ते पडले
दु:खी ज्ञानाईसी तत्काल भानासी आणिले ॥१५॥
‘अरे आज कैसे मज माये व्यापियेले
ब्रह्मबोधावरुनि मन खाली रे हटविले ॥१६॥
क्षुद्रतेने मज बुद्धीसी व्यापुनिया
अद्वैतातुनि कैसे रे द्वैतात आणियेले ॥१७॥
मुक्ते तुवां मज डोळा आज अंजन घातले’
क्षमा करुणा वसंती पुन:, ज्ञान हृदय पालाविले ॥१८॥
खाडकन् ताटीचे द्वार ते उघडले
चिमुकल्या मुक्ताईसी ज्ञानदादे कडेवरी घेतले ॥१९॥
ज्ञानाचे तेज विश्वी लख्ख लख्ख फाकले
लहानग्या मुक्ताईचे मन आनंदे धाले ॥२०॥
आर्त मनीचे ज्ञानाईचे, उपदेशी प्रकटले
ज्ञानेश्वरी बोले, विश्वा ब्रह्मद्वार उघडिले ॥२१॥
ताटीचे अभंग ज्या मुखावाटे प्रसविले
गुणकीर्ती गाऊनिया आपण पाहिजे तिसी नमिले ॥२२॥
माऊलीच्या कुशी आज, सारे विश्व विसावले
कृष्णदास म्हणे श्रेय, पाहिजे मुक्ताईसी दिले ॥२३॥
******
२१.०७.२०१२
Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
— सर्व रचना © कृष्णदास
Leave a Reply