माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज

जन्म: श्रावण वद्य अष्टमी शके ११९७
समाधी: कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२१८


नमन माझे ज्ञानेश्वरा, प्रेम कृपासागरा
विष्णुरुप अवतारा, निवास करी अलंकापुरा
गुरुभक्ति रहस्योद्गारा, ज्ञानदीप प्रकाशकरा
वैराग्यबोध उपदेशकरा, आत्मसूर्य उदयकरा
भावार्थदीपिका घेउनि करा, देई साधका अमृतानुभवा
कृष्णदास जोडोनि करा, याचना करी ज्ञानेश्वरा
गुरुरुपे कृपाकरा, कृष्ण सरस्वतींचा उपदेश लाभे करवीरा


अलंकापुरी विवरी, बैसला ज्ञानराज माझा, बैसला ज्ञानराज माझा
ज्ञानमुद्रा सिद्धासनी हो, भृकुटी नेत्री सरळ मेरु हो
सुवर्ण पुतळा कैवल्याचा, निरंजनी रमलासे सहजा, बैसला ज्ञानराज माझा …
सुहास्य सुंदर तेज मुखावर, केश कुरळे रुळती भूवर
मदन लाजतो रुप मनोहर, योगिराज, नाही सम या दुजा, बैसला ज्ञानराज माझा …
सोऽहं भाना झाला विसर, आत्मरुप ते सर्व चराचर
विश्‍वात्मक हो झाले अंतर, कळवळा माऊली ना दुजा, बैसला ज्ञानराज माझा …
चंदन परिमळ मंद दरवळ, हुंगिता हो भाना विसर
देवही सदा सेवे सादर, साधुसंता मनी अत्यादर
कृष्णदास हा नमितो नित्य, करुनि मानसपूजा, बैसला ज्ञानराज माझा …


आळंदीसी बैसली माऊली, वैश्विक भक्ता करितसे साऊली
महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर, गीता उकलण्या परतला बा भूवर
भक्ति ज्ञान कर्म योग रहस्ये उलगडली, सांगुनि ग्रंथराज ज्ञानेश्वरी
अद्वैताचा अमृत अनुभव, ग्रंथी विशद अमृतानुभव
भागवत धर्म रोविला नीट, सांगुनि वारी अन् हरिपाठ
नाथसंप्रदायी थोर योगी, भक्तिपथाची सुलभता विवरी
अल्पवयातचि इंद्रायणीतीरी समाधी, दर्शन घेता हारपलो शुद्धी!


ज्ञानेश्‍वर ज्ञानेश्‍वर गर्जे घोष हृदयात
मन माझे पोहोचते आळंदीत क्षणार्धात
ज्ञानोबांची सुकुमार मूर्ती येई नजरेत
आठव तो होता होई हृदय प्रफुल्लित
राम कृष्ण हरि मंत्र गुंजतसे दो कर्णात
माथा माझा शिळेवरी वाटे मी गाभार्‍यात
माऊलीचा कळवळा जाणवे अंतरात
कृष्णदास माऊलीची कृपा नित्य अनुभवत


रोम रोमी उठो नाम ज्ञानदेव ज्ञानदेव
राहो स्मरण अलंकापुरी नित्य जे सुखधाम
अजानाच्या तळी बसता हरो माझे हे अज्ञान
भक्ति ज्ञान अन् योगाची अंगी बाणो मज खूण
माऊलीच्या स्मरणी ध्यानी न पडे काही वाण
कृष्णदास जाणुनिया माऊलीसी नित्य शरण


माझ्या ज्ञानाईची साद, उभ्या विश्‍वात गुंजत
बोलाविते सर्वांसी, या हो या हो आळंदीत
करा करा संसार, परी रमू नका त्यात
भावे भजा श्रीहरिसी, त्यातचि हो हित
राम कृष्ण हरि नाम, असे जो जपत
कृष्णदास म्हणे घेई, त्यासी माऊली कुशीत


ज्ञाना बाळ झाला माझा, माऊली जगाची
बाळ झाला माऊली ही रित आगळीची
वाहतसे तोचि नित्य काळजी जगाची
मायेहुनि करुणा भरली हृदयात साची
कृष्णदास म्हणे आठवण करू माऊलीची
उतराई होण्या करू वारी आळंदीची


प्राण गेला चिदाकाशी, तत्वे विराली आकाशी
समाधीत ज्ञानदेवा, स्थिती झाली ऐसी
आकाश ते व्यापोनिया, राही सर्वगत
नाही कोठे ऐसे काही सर्व ब्रह्मांडात
माऊलीच्या दर्शनाची आस हृदयात
रुपाचा तो अनुभव घेण्या हृदय तळमळत
कृष्णदास माऊली गे तुज विनवित
भाव देई तुचि ऐसा होईल रुप घनीभूत


ज्ञानाई ज्ञानाई धाव माझे आई
बाळ पहा तळमळुनि पाचारितो घाई
शोधितो मी तुजला पहा ठाई ठाई
बैसली का डोळे मिटुनि अजानाच्या पायी
ध्यानयोगे करितो मी तुज पहाण्यासी घाई
परि माझे अंत:चक्षू उमलत नाही
कृपा करी कृपा करी कृपा करी आई
कृष्णदासे म्हणे झाली मज दर्शनाची घाई


लक्षितो हृदयी नित्य तुज मी ज्ञानाई
परी नयनी तुझी मूर्ती येत नाही
करु काय सांग आई त्यासी मी उपायी
कृष्णदास म्हणे दाखवी मज काहीतरी सोई


ज्ञानाई ज्ञानाई हृदय माझे गाई
तळमळुनि कळवळुनि नेत्रा पाणी येई
रुप तुझे लक्षितो गे पहा ठाई ठाई
कृष्णदास पाचारितो त्वरित धावुनिया येई


कळस शोभतो अंबरी, अलंकापुरी
ज्ञानदेव समाधीत विवरी, बैसले समाधीत विवरी
सुवर्ण पिंपळ पर्णे झळझळ करती सामोरी
लगबग लगबग दाटी दर्शना करती वारकरी
सोऽहं सोऽहं प्रणव घोष घुमतो गाभारी
सभामंडपी गर्जे घोष राम कृष्ण हरि
कृष्णदासा आठव होता प्रेमे उर भरी
ज्ञानदेव ज्ञानदेव होतसे उच्चार वैखरी


इंद्रायणी जल वाहे खळ खळ
सुवर्णपिंपळ पाने करती सळ सळ
दर्शनासी भक्तांच्या हृदयी तळमळ
अलंकापुरी वारकरी जमले बाळ गोपाळ
माऊलीच्या अंतरात अति कळकळ
जाणवुनि कृष्णदासा नेत्री घळघळ


ज्ञानदेव ज्ञानदेव जाणा अंतरीचा भाव
कृपाळू तू माऊली गे पदी तव देई ठाव
संसारासी करितो या अतोनात धावाधाव
मोहमाये गुंतुनिया विसरलो निज ठाव
मनाचिया काय करू सरतसे ना गे हाव
जिव्हेवरी येतसे ना माऊली गे नाम तव
कृष्णदास प्रार्थितसे माऊली गे करी कणव
अलंकापुरीसी गे मज बोलव बोलव


माऊली माऊली, हृदय माझे कळवळत
बाळासी माऊली कां, असे कधी अंतरत
आठविता प्रेमे धाव, घेई कशी क्षणार्धात
कृष्णदास विनवि तू गे, देई त्याची प्रचित


भिजलो भिजलो भावभक्तिच्या राज्यात
पोहोचलो न कळले मज केव्हा आळंदीत
अलगद माऊलीने घेतले कुशीत
भावनांच्या कल्लोळी मी चिंब चिंब होत
कृपावर्षावाची तिची आगळीच रित
कृष्णदास कृपावृष्टी अनुभव नित्य घेत


माऊली गे हृदय, नित्य भरुनि येत
पाऊले टाकता, तुझ्या आळंदीत
राम कृष्ण हरि घोष, कानात गुंजत
इंद्रायणी तीरी भक्त, हरिपाठ गात
टाळ वीणा मृदुंग, हरि नाम गात
दिंड्या अन् पताका, अंबरी झेपावत
महाद्वारी येता येई, आनंदा भरित
कृष्णदास हारपतसे, देहभान त्वरित


रिमझिम रिमझिम वर्षती धारा
बैसलो मी इंद्रायणी तीरा
खळखळ वाहते इंद्रायणी धारा
वर्षति वरुनि पर्जन्याच्या धारा
हेही जल तेही जल होता एकाकार
पाहताऽऽ पाहताऽऽ, झाला भाना विसर
राम कृष्ण हरि घोष येई कानावर
पडताचि लकेर कानी, आलो भानावर
भानावर येता आले नयनीही नीर
जला जली मिळाली तीही जलधार
ज्ञानोबा माऊलीचा असे चमत्कार
डोळे मिटुनिया हसली, खुद्कन क्षणभर
कृपावर्षावाची थोरी जाणवुनि अंतर
कृष्णदासा मनी मंद हास्याची लहर


गुरुभक्ति गुरुसेवा, नाथपंथीचा तो प्राण
योग भक्ति ज्ञान कृपे सहजी प्राप्त जाण
नाश होण्या ‘मी’ पण जे अहंकार ठाण
एकनिष्ठ भावे भजा श्रीगुरुंसी प्रतिक्षण
नका पळू ढळू ते होता परीक्षण
महाकठीण परी असे आधार क्षणोक्षण
तोषिता श्रीगुरु मग कशासीही ना वाण
कृपादृष्टी पडता उघडे आनंदाची खाण
ज्ञानदेव जाई निवृत्तीसी शरण
वर्णिले असे तेणे गुरुभक्तिचे लक्षण
कृष्णदास करीतसे ते चिंतन प्रतिक्षण
याचितसे गुरुभक्तिविना ना जावो वाया क्षण


देतो हाक ज्ञानेश्वरा, अलंकापुरीच्या सुकुमारा
प्रवेश करी हृदयविवरा, बैसलासी समाधी विवरा
व्यापुनी राहिला विश्वास, बोल तुमचेच यांस साक्ष
करितो आदेश अलक्ष, करी मजसी अलक्ष
साधनी करुनि दक्ष, राहे जेणे अखंड अलक्ष
कृष्णदास अलक्षी, माऊलीसी अखंड लक्षी


मारितो हाका, तव जाग येई ना कां
बाळाच्या ऐकता हाका, माऊलीस नीज कधी कां
मज माऊलीच तू ना कां, मग धाव ऐकुनी हाका
कृष्णदास इच्छितो भेटी, मग माऊलीस निजू देई कां


माऊली दर्शन देई मज आज, माऊली प्रगट होई तू आज
क्षणभरी सोडी समाधी आज, क्षणभरी येई बाहेरी आज
पुरवि मानस मनीचा आज, देई सदेह दर्शन मज आज
बाळ हट्ट हा माऊली माझा, पुरवि तू गे आज
दर्शन तव नयना इच्छितो, मनी दुजी न इच्छा आज
कृष्णदास आळंदी आज, येऊनि प्रार्थितो माऊली तुज
रुप दावुनी तव सुकुमार, यात्रा सफल करी गे आज
माऊली दर्शन देई मज आज, माऊली प्रगट होई तू आज


माऊली महाविष्णू अवतार थोर
आळंदीसी योगिराज ज्ञानेश्‍वर
वय अवघे कोवळे सुकुमार
ज्ञानेश्‍वरी गीतेवरी टीका अति सुंदर
अनुभवामृती कथिले अद्वैताचे सार
हरिपाठी नामाचे महत्व अपार
हरिभक्त संतमेळा जमविला अपार
भागवत पताका नेली पंढरपूर
कार्य सरता प्रवेशले समाधीचे द्वार
संजीवन देह तेथ करी कल्याण अपार
चला चला जन हो अलंकापुर
कृष्णदास जाण्या तेथ सदा हो तत्पर


वारकरी गर्जती, ज्ञानोबा माऊली
पहा दिंडी चालली, कशी संथ पाऊली
टाळ वाजे खणखणीत, वीणा असे झंकारत
मृदुंगाच्या तालावरी, वारकरी नृत्य करीत
इंद्रायणी तीर दिसता, आनंदा उधाण येत
माऊलीचा कळस दिसता, भावे हृदय भरुनि येत
माऊलीच्या महाद्वारी, आनंदाच्या उठती लहरी
ब्रह्मानंदे नाचता ते, देहाचे भान विसरी
माऊली माऊली, गात गात गाभार्‍यात
भाव हृदयी दाटुनि येता, गात्रे होती विगलित
शिळेवरी माथा ठेवुनि, माऊलीसी देता हाक
पान्हाऊनि घेई बघ, माऊली त्वरित कुशीत
ज्ञानोबांच्या दिंडीचा, घ्या हो अनुभव त्वरित
कृष्णदास म्हणे जा हो, एकवार आळंदीत


इंद्रायणीतीरी अलंकापुर, हरिभक्तांचे असे ते माहेर
माऊली विसावली तेथ ज्ञानेश्‍वर, दर्शनासी जाता लोटे नयनांसी पूर
संसारी गुंतलो गमे ते सासर, विसाव्यासी माहेर अलंकापुर
माऊलीशी गुजगोष्टी वदावे अंतर, मनावरील तेथ उतरे सारा भार
माऊलीचा पाठीवरुनि फिरता हस्त थोर,
कृष्णदास म्हणे उतरे भवताप ज्वर


अलंकापुरी नाचत गाजत जमले वारकरी
सभामंडपी बोले वीणा राम कृष्ण हरि
समाधीत बैसले तेथे माऊली ज्ञानोबा श्रीहरि
म्हणती सर्वा एकतत्व नाम दृढ धरी
साधन सारे कठीण जैसा पारद घेता भूमीवरी
सद्गद वाचे भावे गा रे नाम श्रीहरि
कृष्णदास हा जाता दर्शना श्री क्षेत्र अलंकापुरी
परावाणी बोले जय जय राम कृष्ण हरि


संजीवन समाधीत बैसले ज्ञानेश्‍वर,
प्राण ठेला चक्री स्थिर सहस्त्रार
झाले तेचि क्षणी ते विश्‍वाकार,
भक्तांचे क्षणोक्षणी जाणती अंतर
माऊलीपरी ते त्यांचे हो अंतर,
कृष्णदास लक्षितसे निरंतर


अलंकापुरी समाधी विवर,
आत बैसले विश्‍वाकार ज्ञानेश्‍वर
कैवल्याचा पुतळा सुकुमार,
जगाच्या कल्याणा सदा हो तत्पर
भाव धरुनि माथा टेकिता शिळेवर,
बोध करी सत्वरी सोऽहं हुंकार
कृष्णदास म्हणे जाऊ अलंकापुर,
कृपा करतील करुणाकर ज्ञानेश्‍वर


ज्ञानेश्‍वर ज्ञानेश्‍वर गा हो वारंवार
कृपा त्यांची लाभेल अपरंपार
ज्ञान भक्ति वैराग्याचे असे ते आगर
श्रद्धेने लाभेल तेचि फळ सत्वर
जन्ममरणाचा बेडा होईल पार
कृष्णदास म्हणे भावे भजा ज्ञानेश्‍वर


ज्ञानेश्‍वर ज्ञानेश्‍वर रुप अति सुंदर
सगुण कोवळे सुकुमार
निर्गुण चैतन्य जे का निराकार
प्रगटले तेचि रुप सगुण साकार
स्मरणेचि हृदयी उठतो भाव हो अपार
कृष्णदासा होई तो नित्य अनावर


ज्ञानेश्‍वर ज्ञानेश्‍वर अंतरीची लहर
अलंकापुरीशी जुळे सहजी तार
समाधीत ज्ञानदेवा येई गहिवर
कृष्णदास स्मरणी हृदयी तोषतो अपार


ज्ञानेश्‍वर ज्ञानेश्‍वर अंतरीची ललकार
माऊली ती धाव घेई तत्क्षणी तत्पर
विश्‍वाकार माऊली ती जाणे बाळ अंतर
प्रिय बाळा माऊली ती कैसे देई अंतर
कृष्णदासा दर्शनाची आस निरंतर
टाहो फोडी लेकरु गे धाव माये सत्वर


ज्ञानेश्‍वर ज्ञानेश्‍वर घोष गर्जे अलंकापुर
भक्त हृदयी उठतसे प्रेमाचा महापूर
तळमळ तळमळ विरहिणीचा तो ज्वर
दर्शनासी दाह करी भक्ताचे अंतर
भावभक्ती उत्कंठा जाता शिगेवर
कृष्णदास म्हणे देई माऊली साक्षात्कार


जनसागर लोटला अलंकापुरी, नामघोष दाटे अंबरी
जय ज्ञानेश्‍वर जय ज्ञानेश्‍वर, जय ज्ञानेश्‍वर जय ज्ञानेश्‍वर
दुमदुमले अवघे अंबर, माऊलीच्या आठवणीने, नयनी अवघे भरले नीर
जय ज्ञानेश्‍वर जय ज्ञानेश्‍वर, जय ज्ञानेश्‍वर जय ज्ञानेश्‍वर
हृदयी अमित भाव पूर, विवरात गदगदले ज्ञानेश्‍वर
संजीवन त्या समाधीतूनी, प्रकटले बाहेरी भूवर
जय ज्ञानेश्‍वर जय ज्ञानेश्‍वर, जय ज्ञानेश्‍वर जय ज्ञानेश्‍वर
मूर्ती देखुनि कृष्णदासा, मनी दाटला गहिवर
आनंदे गाते मन त्याचे,
जय ज्ञानेश्‍वर जय ज्ञानेश्‍वर, जय ज्ञानेश्‍वर जय ज्ञानेश्‍वर


आली दीपावली, चला शीघ्र पाऊली, दर्शना गुरुमाऊली
जोडोनिया अंजुली, पडोनि चरणकमली, नमू गुरुमाऊली
ज्ञानबोध दीपकली, उजळो हृदयकमली
सोऽहं भाव परिमली, रमो सहस्त्रदलकमली
मी बाळ तू माऊली, राहो कृपासाऊली
कृष्णदास हृदयकमली, प्रार्थी ज्ञानोबा माऊली


– पालखी प्रस्थान –
अष्टमीचा दिन आजि ज्येष्ठ वद्य महिन्यात
माऊली खुशीत आज जाण्या पंढरीत
वारकरी अपार आज जमले आळंदीत
ज्ञानराजा घेण्या सवे पंढरीच्या वारीत
रामकृष्णहरि नाम गर्जत मुखात
टाळमृदुंगाच्या गजरे उधाण हृदयात
देहभान ना तो कोणा सवे पताका नाचत
लक्षिती मनी सर्व ज्याचे कटीवरी हात
योगी बैसती धरुनि ध्यान मनी ज्या लक्षित
भक्तियोगे तो हा देव सहजी होय साक्षात
शिवरुप ज्ञानराज आज देहभावा येत
भक्त होऊनि निघे जाण्या देवाभेटीप्रत
कृष्णदास ध्यानी आज सोहळा लक्षित
देह नव्हे परि मन आज आहे आळंदीत


– पालखी प्रस्थान –
सिद्धेश्‍वर डोलतो, माऊलीसी विनवितो
नका जाऊ वारीसी, विरह मज होतो
समाधिस्थ मूर्ती तुझी, नित्य मी पाहतो
जाता तू वारीसी, रिते रिते गमतो
भक्तांचा लळा तुजसी, जरी संगे जातो
त्वरितचि परत येण्या, तुज मी विनवितो
अचल मी जाणसी, निरुपाय गमतो
मंदिराचा कळस तो, म्हणुनि डोलवितो
माऊलीच्या प्रस्थानाची गोष्ट, कृष्णदास कथितो


माऊलीची करुणा विश्वे अनुभवली
परी अंतरीची वेदना कोणे गे जाणिली? ॥१॥
बालपणीच मातापिते देहासी त्यागिली
अनाथांची माऊली स्वये अनाथ जाहली ॥२॥
संन्याश्याची पोरे म्हणुनि जगी हेटाळीली
मौजीबंधनासी ब्रह्मवृंदे झिडकारीली ॥३॥
चिमुकल्या जीवांची ना करुणा कोणा आली
लहानग्या बाळांसी ग्रामे वाळीत टाकली ॥४॥
पहा मानवता पहा कशी लोप ती पावली
भिक्षान्नासी सुद्धा बाळे महाग जाहली ॥५॥
एके कीजे सांत्वन दुजा, दुजा करी गे तो तिजा
समज या बाळांसी पहा कैसी आली ॥६॥
टाकीचे घाव सोसिता दगडा देवपण येई
परि देवानेचि सोसिले येथे घाव घणाघायी ॥७॥
पाठीवरी मांडे भाजिता, रेड्यामुखी वेद वदविता
ब्रह्मनिष्ठांच्या अधिकाराची जाण जगा आली ॥८॥
वृक्ष देई साउली, जल शमवी तृष्णा
धरती देई आधार, संता ना दुजे क्षमेविना ॥९॥
काय त्यांचे अंतर, करुणा निरंतर
मानवाच्या उद्धाराची तळमळ व्यापियेली ॥१०॥
ईश्वरप्राप्तीची वाट ज्ञानेश्वरी कथियेली
अमृतानुभवे अन् गाथे निजानंद स्थिति वर्णियेली ॥११॥
चांगदेवा गर्वपरिहार भिंत चालविली
विश्वव्यापी चैतन्याची खूण दाखविली ॥१२॥
पहा पहा बालपणी जी छळिली गांजिली
माऊली माऊली म्हणुनि आज विश्वे पूजियेली ॥१३॥
विश्वकल्याणाची आस त्यांची परि ना शमली
देह राखुनिया संजीवन समाधिस्थ जाहली ॥१४॥
दृश्य कल्पिता मनबुद्धिसहित तटस्थता आली
वर्णिता कृष्णदासाची लेखणी स्तब्ध झाली! ॥१५॥
******


 

श्री ज्ञानेश्वर माऊली समाधि प्रसंग

जगण्याचा जगती मोह न टळला कुणा |
परि… पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
कृतकृत्यता बालवयातचि, उरले नाहीच प्रयोजना |
पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
भावार्थदीपिका ज्ञान प्राकृती, उकलला परमार्थचि जाणा |
पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
अनुभवामृती अद्वैतानुभव, शब्दांची, किमया वर्णवेना |
पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
चांगदेव जो योेगी मिरविला, अहंकार, उडविला एकचि क्षणा |
पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
ज्ञान-भक्तिचे अभंग अगणित, दाविल्या, योगाच्याही खुणा |
पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
गुरुकृपांकित ज्ञानी जरि परी, पुतळा, नम्रताचि पूर्णा |
पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
शिष्य शिष्य ते कितिक जाहले, परि, ऐसा ना त्रिभुवना |
पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
जेष्ठाआधी कनिष्ठ चालला, आसवां, थारा ना जाणा |
पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
निवृत्ति सोपान मुक्ताईच्या, दु:खा, कोण करील वर्णना |
पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
पुष्प सुगंधी माळ गळा ती, देहीचे, तेज वर्णवेना |
पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
गुरु निवृत्ति धरिलासे कर, धरिती दुजा तो, पंढरीराणा |
पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
डौलदार गंभीर चाल ती, सुमुख शांत भावना |
पहा चालतो, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
नंदी उठवुनि विवरी शिरले, आसन सारे सिद्ध देखिले |
ज्ञानेश्वरी सामोरी ठेवुनि, जाहले, पद्मासनस्थ आसना ॥
नमन गुरुवरा, त्रिवार करुनि, मिटले दो नयना |
प्राण चढविला, ब्रह्मविवरी, जाहली समाधी संजीवना ॥
उदास मानसी शिळा रचिली, एकचि कोलाहल जाणा |
भर माध्यान्ही, लोप भास्करा, तिमिर, दाटे जणू भुवना ॥
कार्तिकमासी कृष्ण त्रयोदशी, जमले वैष्णव अलंकापुरा|
कृष्णदास ते दृश्य कल्पितो, बसुनि निजआसना ॥
अशी चालला, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
अशी चालला, वाट समाधी, ज्ञानेश्वर राणा ॥
* * *
नमुनिया ज्ञानदेवा भावे, पावन आशीर्वादा घ्यावे |
कृष्णदास बालक प्रार्थितो, माऊली, नित्य सांभाळावे ॥
* * * * *

(कार्तिक वद्य त्रयोदशी शके १९३६ (२० नोव्हेंबर २०१४) दु. १२.३०)


 

Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *