संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज

nivruttinath samadhi

जन्म: माघ वद्य प्रतिपदा शके ११९५
समाधी: जेष्ठ वद्य द्वादशी शके १२१९

निवृत्तिनाथ माझा महेशु खरोखरु
आत्मरुपी सदा स्थिरु शांतिचा दातारु ॥१॥
गहिनीनाथे बोध करिता आत्मरुपी झाला त्वरु
जनोद्धारालागी आला हो देव हा भूवरु ॥२॥
सांभाळिले भावंडांते जसे पोटीचे लेकरु
कृपाछत्र त्याचे केवळ सर्वांसी आधारु ॥३॥
मायबाप त्यागी शरीर परि नेणीव नेदी उरु
भावंडांसी झाला मायबाप, आणी तोचि गुरु ॥४॥
ज्ञाना सोपाना मुक्ताईसी झालासे सद्गुरु
कृपे निज पावविले अवघ्यांसी पैलपारु ॥५॥
‘ज्ञानेश्वरी वदतो मी जो बोलविता श्रीगुरु
अनुभवामृत त्यांचे कृपे’, वदले ज्ञानेश्वरु ॥६॥
ज्ञान शांति वैराग्याचा नाथ महामेरु
संप्रदाय महाराष्ट्री तोचि त्यासी आधारु ॥७॥
योगी वरिष्ठ परि गाईला नामाचा बडिवारु
वैष्णवांची मांदियाळी नेली गुढी पंढरपुरु ॥८॥
कनिष्ठ आधी समाधिस्थ पहा कैसा धैर्य मेरु
आठवण ती येता नयनी भरुनि येते नीरु ॥९॥
मन किती प्रेमळ कोमल परि सहनशक्ति अपारु
आघात सारे सोसुनिया वाचे ना उच्चारु ॥१०॥
अंतरीची वेदना त्यांची कल्पना मज नये करु
भावविगलित हृदयस्थिति लेखनी हस्त थरथरु ॥११॥
तिन्ही लोकी पहा पहा नाही होणे ऐसा नरु
स्मरणेचि येते हृदय भरुनि अनिवारु ॥१२॥
करुनि सर्व अलिप्त कैसा, वाटे अतिशय नवलाकारु
देखिले ना ऐशा संता, विराला अहंकारु ॥१३॥
मज मना हाचि गमे संतवरु
मन इच्छी प्रवेशाया दर्शना समाधी विवरु ॥१४॥
ज्येष्ठ म्हणुनि जणू ज्येष्ठ मासी त्यागियेले शरीरु
ब्रह्मगिरी गुरु सानिद्धी राहिला हा अवतारु ॥१५॥
नाही नाही नाही गेला, प्राण सहस्त्रारु
विश्वकल्याणासी झटतसे निरंतरु ॥१६॥
योगिनी एकादशीसी यात्रा चाले त्र्यंबकेश्‍वरु
राम कृष्ण हरि नाम सर्वामुखी गजरु ॥१७॥
दर्शना जाता तेथ प्रवेशिता गाभारु
शांत स्थिर निवृत्तिचा अनुभव येई सत्वरु ॥१८॥
गाऊनिया गुण कथा हर्षे येतो उर माझा भरु
सुखसागर कल्लोळी मी, मनी हासे श्रीगुरु ॥१९॥
मन धावे लेखणीही, कैसे त्यासी आवरु?
शब्दफुलांची ही माला, माये करि गे स्वीकारु ॥२०॥
पुण्यतिथि आज चला भावे स्मरण करु
त्र्यंबकेश्‍वरी जाऊनिया मनेचि नमन करु ॥२१॥
आशीर्वाद घेण्या मन माझे अधीरु
ज्ञानदान देऊनिया आत्मरुपी करा हो स्थिरु ॥२२॥
कृष्णदास प्रार्थितसे माथा ठेवा पद्मकरु
निवृत्तिराया घेई कुशीत तुझे मी लेकरु! ॥२३॥
******

–जेष्ठ वद्य द्वादशी शके १९३४ (१६ जून २०१२)

Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी जमली संत सभा
नाथ निवृत्ति द्या हो दर्शन सोडुनि समाधीसुखा ॥
बोध करी गा सोडवी सत्वरी, रमलो विषयसुखा
आळविती ते स्वरे कातर, नमुनि भावे एका ॥
ज्ञानदेव गुरु, गैबीदास तू विनती ही अवधारा
वृत्तिरहित ती स्थिति अम्हासी देई योगीवरा ॥
पिंडाचा ना ग्रास तोवरी ‘मी’ चा सर्व पसारा
कृष्णदास म्हणे सोऽहं बोधे, नाथ दंश करा त्वरा ॥


नाथ हा माझा निवृत्ति,  थोपविल्या साऱ्या ज्याने वृत्ती
निवसे हा जो ब्रह्मगिरी, महादेवाच्या बरोबरी
संप्रदाय त्याचा महाराष्ट्रभरी, भक्त दर्शना जाती भारी
बोलेना हा जरी काही तरी, लक्ष असे त्याचे सर्वांवरी
बैसलासे तो ध्यानस्थ विवरी, नमन मी करी समाधीवरी
आशीर्वाद देई मज प्रेमभरी, अलक्ष आदेश ह्या हो गजरी
कृपेला ह्या नाही हो सरी, सद्गदित मी हर्ष उरी भरी!


संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज आरती
जय देवा जय देवा निवृत्ति सूर्या |
भावे ओवाळीतो तुजसी गुरुवर्या ॥ध्रु.॥
गयनी कृपास्पर्शे तळपसी यतिवर्या |
अज्ञानतिमिरांधी प्रकाश अर्पाया ॥१॥
शिवअवतार परी मूर्त शांति तू सदया |
स्वरूपस्थित साक्षी तू चिरंजीव जगी या ॥२॥
श्रांता भ्रांता जीवा त्वरिता उद्धराया |
आज्ञापी ज्ञानेशा दीपिका तेवाया ॥३॥
कृपास्पर्शे माया जाई गे विलया |
कूर्मदृष्टी पोशिसी निजभक्तां सखया ॥४॥
शरणांगत तव पदी ही साष्टांग काया |
कृष्णदास हृदयस्था प्रार्थी, नित कृपाछाया ॥५॥
(पौष कृष्ण एकादशी शके १९३६ – श्री निवृत्तिनाथ यात्रा, त्र्यंबकेश्वर – १६ जानेवारी २०१५)
PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्यावरील एक लेख

PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *